लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पीएमपीमध्ये गुगल पे, फोन पे’द्वारे तिकीट काढण्याची सुविधा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार असून या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद थांबणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे. या दोन्ही शहरातून किमान दहा ते बारा लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. याशिवाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ग्रामीण भागाच्या हद्दीतही पीएमपीकडून सेवा दिली जात आहे. विविध मार्गांवर प्रवास करताना प्रवासी आणि वाहक यांच्यात नेहमी सुट्ट्या पैशांवरून वाद होत असल्याचे प्रकार सातत्याने पुढे आले होते. त्यामुळे आता त्यावर उपाय म्हणून फोन पे, गुगल पे द्वारे तिकीट काढण्याची सुविधा पीएमपीकडून दिली जाणार आहे. त्याबाबत पीएमपीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून येत्या काही दिवसांत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येऊन निर्णयाची अंमलबाजवणी सुरू होणार आहे.
आणखी वाचा-कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालय विकायला काढले आणि ‘अशी’ केली फसवणूक
सध्या ऑनलाइन व्यवहारांना वाढता प्रतिसाद आहे. लहान -मोठे व्यवहारही डिजिटल पद्धतीने होत आहेत. त्यातच मेट्रोनेही कार्डद्वारे प्रवासाची सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पीएमपीनेही डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्याची सुविधा देण्याचे पीएमपी प्रशासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार हा निर्णय घेतला जाणार आहे.