भुशी धरणाजवळील टायगर पॉइंट या ठिकाणी मध्यरात्री मद्य प्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग व हुल्लडबाजी करणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींची शहर पोलिसांनी तेथून हकालपट्टी केली. पुढील दहा दिवस या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवून हुल्लडबाजांवर कारवाई करणार असल्याचे लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक आय. एस.पाटील यांनी सांगितले.
शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे लोणावळ्यात दोन दिवसांपासून पर्यटकांची मोठी गर्दी आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेकरिता रात्री उशिरा लोणावळा शहर पोलिसांची गस्त सुरू असताना टायगर पॉइंट येथे मोठय़ा प्रमाणात तरुण-तरुणी यांचा वाद्यांच्या आवाजात धांगडिधगा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक पाटील व त्यांची टीम टायगर पॉइंट येथे पहाटे साडेतीनच्या सुमारास गेले असता तेथे मोठय़ा आवाजात गाणी वाजवत शेकडो तरुण व तरुणी मद्याच्या नशेत अश्लील हावभाव करत नाचत होते. काही जण मोठमोठय़ाने ओरडत होते, पॉइंटवर पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी होती. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तातडीने या सर्वावर कारवाई करत त्यांना टायगर पॉइंटवरून हाकलून देण्यात आले. पहाटे उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
नाताळ ते थर्टी फस्ट दरम्यान लोणावळा व ग्रामीण परिसरात मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची वर्दळ राहणार आहे. या दरम्यान रात्री उशिरा कोणी पर्यटक हुल्लडबाजी करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील यांनी दिला आहे. मागील काळात रेव्‍‌र्ह पाटर्य़ासारख्या अनेक घटना लोणावळा परिसरात घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर व आठवडाभरावर आलेला नाताळ व थर्टी फस्टमुळे यामुळे शहरात होणारी गर्दी याचा विचार करत शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त नेमण्यात आला असून वाहतूक नियोजनासाठी अतिरिक्त पोलीस नेमून, मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जागो जागी ब्रिथ अँनालायझरद्वारे संशयिताची तपासणी करण्यात येणार आहे.

Story img Loader