पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सतर्कतेचा आदेश देण्यात आला असून, कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोंढवा भागातील दहशतवादी कारवायांमुळे संवेदनशील ठिकाणी पोलिसांची पथके तैनात केली आहेत.पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्कतचा आदेश दिला आहे.
हेही वाचा >>> पुणे : पर्यटन ठिकाणी जाणाऱ्यांसाठी पीएमपीकडून १०१ अतिरिक्त बसेसची सोय
गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१५ ऑगस्ट) शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी बंदाेबस्तात वाढ करण्यात आली असून, साध्या वेशातील पोलीस गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणार आहेत. शहरातील गर्दीची ठिकाणे, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पोलीस पथक तैनात करण्यात येणार आहे. लाॅज, हाॅटेलची तपासणी करण्यात आली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> भूगाव बाह्यवळण मार्गाचे काम सुकर; जागामालकांची जमिनी देण्यास सहमती
दरम्यान, पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आयसिस आणि अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित सात जणांना नुकतीच अटक केली. कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना दोघांना पोलिसांनी पकडले होते. चौकशीत दोघेजण एनआयएच्या फरार गुन्हेगारांच्या यादीतील दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाल्यावर खळबळ उडाली. कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून पाच जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, एनआयएने हडपसर भागातील एका रुग्णालयातील डॉ. अदनान अली सरकार याला अटक केली होती. एटीएसने अटक केलेला दहशतवादी झुल्फिकार अली बडोदावाला याचे डाॅ. सरकारशी नातेसंबंध असल्याचे उघड झाले होते. आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करण्यात महाराष्ट्रातील गट कार्यरत होता. दहशतवादी कारवायांची व्याप्ती देशभरात असल्याचे उघडकीस आल्यानंतर एटीएसकडून तपास एनआयएकडे नुकताच सोपविण्यात आला.