पुणे : वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा प्रारंभ बुधवारी झाला. पुढील दहा दिवस मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होणार असून गर्दीचे नियंत्रण करण्याचे नियोजन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रतिष्ठापनेच्या दिवशी मध्यभागातून मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रयत्न केले. उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी झाली होती.

हेही वाचा >>> राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरस्कार

गेले दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. यंदा उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. प्रतिष्ठापनेनिमित्त शहर तसेच उपनगरातील मंडळांनी मिरवणुका काढल्या. मिरवणुकीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी नियोजन केले. चौकाचौकात वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बुधवारी सकाळपासून मंडई, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, शिवाजी रस्त्यावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मानाच्या मंडळांच्या मिरवणूका पाहण्यासाठी गर्दी झाली होती. दुपारनंतर मानाच्या मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.

हेही वाचा >>> Ganesh Utsav 2022 – पुणे : गर्दी वाढल्यास वाहतुकीत बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने

मिरवणुकांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) वाहतुकीस बंद केला होता. उत्सवाच्या कालावधीत साडेसात हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून उत्सवाच्या काळात शहर तसेच उपनगरात पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच शीघ्र कृती दल, गु्न्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याबरोबरच राज्य राखीव दलाचे जवान, गृहरक्षक दलाचे जवानांच्या तुकड्याही संवेदनशील ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. छेडछाड, चोरी असे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके गर्दीत गस्त घालणार आहेत.

Story img Loader