पुणे : केंद्रात तसेच राज्यात सत्ता असलेल्या आणि महापालिकेत पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतरही भारतीय जनता पक्षावर मध्यवर्ती कार्यालयासाठी जागा बदलण्याची वेळ आली आहे. जोगेश्वरी मंदिराजवळील कार्यालयानंतर जंगली महाराज रस्त्यावरील हाॅटेल सन्मान येथे कार्यालय थाटल्यानंतर महापालिका भवनासमोर मुक्काम हलविण्यात आला. मात्र जागा मालक मुदत वाढवित नसल्याने शहर कार्यालय स्थलांतरीत करण्याची वेळ जगातील सर्वाधिक मोठ्या राजकीय पक्ष असल्याचा दावा आणि सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या भाजपवर आली आहे. डीपी रस्त्यावर नवे कार्यालय लवकरच सुरू होणार असून त्याबाबतच्या वृत्ताला भाजप पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यालयातून भाजपचे कामकाज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका भवनासमोरील एका इमारतीमध्ये भाजपचे कार्यालय तीन वर्षापूर्वी जंगली महाराज रस्त्यावरील सन्मान हाॅटेलमधून स्थलांतरीत करण्यात आले. या भागात स्थलांतरीत होण्यापूर्वी त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. पार्किंगची सुविधा आणि बहुमजली इमारतीमध्ये प्रशस्त जागा उपलब्ध होणार असल्याचा दावाही भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. या जागेतून तीन वर्षे कारभार चालला. मात्र जागा मालकाने मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने नव्या जागेचा शोध घेण्याची वेळ भाजप पदाधिकाऱ्यांवर आली. त्यानुसार डीपी रस्त्यावर एक प्रशस्त जागा निश्चित करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मात्र देशातील सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला हक्काचे कार्यालय का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा >>>करोनाचा उपप्रकार जेएन.१ चा राज्यात शिरकाव; कुठे आढळला पहिला रुग्ण?
महापालिका भवनाजवळील जागा अपुरी पडत होती. पक्षाचा वाढता विस्तार लक्षात घेता नवे प्रशस्त कार्यालय हवे होते. जागेच्या मर्यादेमुळे नवे कार्यालय घेण्यात आले आहे. येथे पार्किंगचीही सुविधा असून मोठ्या स्वरूपातील कार्यक्रम घेण्यासाठीही अनेक सुविधा येथे आहेत. कायमस्वरूपी जागेसाठीही प्रयत्न सुरू असून प्राथमिक चर्चाही झाली आहे, असे घाटे यांनी सांगितले. मात्र जागा नेमकी कोणत्या कारणासाठी सोडावी आणि शोधावी, लागली याची चर्चा मात्र शहराच्या राजकीय वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली आहे.
भाजपला हक्काचे कार्यालय मिळावे, यासाठी काही वर्षांपूर्वी प्रयत्न करण्यात आले होते. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सत्ता आहे. तर राज्यातही पक्ष सत्तेत असून पाच वर्षे महापालिकेची सत्ताही त्यांच्या ताब्यात होती. मात्र त्यानंतरही पक्षाला हक्काची कायमस्वरूपी जागा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने डेंगळे पूल परिसरात नव्याने कार्यालया उभारले आहे. यापूर्वी टिळक रस्त्यावरील गिरे बंगल्यातून पक्षाचे कार्यालय होते. तेथून अनेक वर्षे कामकाज करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरून लालबहादूर शास्त्री रस्त्यावर स्वत:चे कार्यालय घेतले आहे. काँग्रेसचे कामकाज कित्येक वर्षांपासून काँग्रेस भवनातून चालत असून ठाकरे गटाचे डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे तर शिवसेनेचे सारसबाग परिसरात कार्यालय आहे.