पुणे : राज्यातील क्रीडा गुणवत्तेचा गौरव करण्यात येणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडा खात्यातील अधिकाऱ्यांचे कान टोचले. भविष्यात क्रीडा पुरस्कार सोहळा वेळेवर होण्याची आवश्यकता असल्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या सोहळ्यात माजी कबड्डीपटू शकुंतला खटावकर, तसेच माजी बॅडमिंटनपटू व संघटक प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्य शासनाकडून काही ना काही कारणाने लांबणीवर पडलेला राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा शुक्रवारी म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते संपन्न झाला. यात २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कारांचे वितरण करण्यास जसा उशीर झाला, तसा सोहळाही उशिरानेच सुरू झाला. दुपारी ११ वाजताची वेळ असताना कार्यक्रमाला सुरुवात होण्यास दुपारचा १ वाजला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, राज्याचे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे असे मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणासह तब्बल १५९ पुरस्कार्थींचा सन्मान अवघ्या ९० मिनिटांत ‘आटोपण्यात’ आला.

‘‘एकाच सोहळ्यात दोन-दोन वर्षांचे पुरस्कार वितरित करताना आम्हाला भाषणासाठीही वेळ पुरत नाही,’’ अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली. तसेच क्रीडा अधिकाऱ्यांनी यापुढे पुरस्कार वेळेवर जाहीर होतील आणि त्याचे वितरण ठरल्यावेळी पार पाडले जाईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुरस्कार सोहळा वेळेवर का पार पडत नाही या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याकडे विचारणा केल्याचे पवार यांनी सांगितले.

‘‘राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राने गेली तीन वर्षे सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. आता महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले आणि राज्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविण्याची गरज आहे,’’ अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. ‘‘खेळामध्ये कारकीर्द घडविणाऱ्यांच्या उत्कर्षासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेपासून, आर्थिक मदत ते खेळाडूंना शासकीय नोकऱ्या देण्यापर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात शांत बसू नका. अधिक जोमाने काम करा. येणाऱ्या भावी पिढीला दिशा दाखविण्याचे काम या पुरस्कार्थींनी करावे आणि खेळात महाराष्ट्राला सर्वोत्तम करण्याचा संकल्प करावा,’’ असे आवाहनही या वेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

आर्थिक तरतूद वाढवतो, फक्त काम करा

क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी कार्यक्रमाला सुरुवात करताना केलेल्या प्रास्ताविकात खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांनी आपली भेट घेऊन क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आगामी अधिवेशनात पुरवणी मागण्यात आर्थिक तरतूद वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर करतानाच फक्त तुम्ही झटून काम करा असे आवाहनही केले.