पत्नी; तसेच सासरच्या लोकांकडून त्रास देण्यात आल्याने जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खडकी भागात घडली.समीर निवृत्ती नाईक (वय ३८, रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय ६५, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>पुणे: आळंदी यात्रेसाठी पीएमपी प्रवाशांच्या सेवेसाठी जादा गाड्या सोडणार
समीर खडकीतील दारुगोळा कारखान्यात कामाला होते. समीर आणि पत्नी उषा यांच्यात वाद व्हायचे. उषा पैशांची मागणी करत होती. समीरने पत्नीला दहा लाख रुपये दिले होते. पत्नी आणि नातेवाईकांच्या मानसिक त्रासामुळे समीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. समीरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.