लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : उष्णतेच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यातील शाळा आता सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांची वेळ सकाळी सात ते सव्वाअकरा, तर माध्यमिक शाळांची वेळ सकाळी सात ते पावणेबारा अशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी याबाबतचे संयुक्त परिपत्रक आणि वेळापत्रक प्रसिद्ध केले. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी महसूल आणि वन विभागाने, जिल्हा स्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करायच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या होत्या.
तसेच, राज्यात वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळांची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदने देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळांच्या वेळापत्रकांत एकवाक्यता आणण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.
अशा आहेत सूचना…
- सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांची वेळ : सकाळी सात ते सव्वाअकरा
- माध्यमिक शाळांची वेळ : सकाळी सात ते पावणेबारा
- उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात.
- उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात.
- मैदानात वर्ग घेऊ नयेत.
- विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी प्रशिक्षित करावे
- वर्गांमध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी
- विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर, तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या अशी हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावेत.
- डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपरिक साधने वापरावीत.
- उन्हात जाताना बूट किंवा चप्पल घालणे.
- उन्हात बाहेर पडणे टाळावे.