देशातील काळ्या पैशांचे प्रमाण कमी करण्यासाठी चलनातील मोठय़ा नोटांचे प्रमाण कमी करावे, अशी मागणी ‘अर्थक्रांती’ चळवळीने ‘रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया’कडे केली आहे. या संदर्भात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (१४ ऑगस्ट) मुंबई येथे ‘चलो आरबीआय’ जागरण मार्च काढण्यात येणार आहे.
१५ ऑगस्ट रोजी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. आता आर्थिक स्वातंत्र्य मागण्याच्या उद्देशातून हा प्रयत्न केला जात आहे, असे ‘अर्थक्रांती’चे प्रदेश संघटक प्रभाकर कोंढाळकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई येथील रिझव्र्ह बँकेच्या मुख्यालयात गव्हर्नर रघुराम राजन यांची भेट घेऊन त्यांना १२६ कोटी भारतीयांच्या वतीने पत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेचे दर्शन गोरे, सुरेखा जुजगर आणि समीर इंदलकर या वेळी उपस्थित होते.
कोंढाळकर म्हणाले, रोखीचे व्यवहार कमी झाले, तर काळ्या पैशांचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळेच चलनातील १ हजार रुपये, ५०० रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचे सध्या असलेले ९३ टक्के हे प्रमाण कमी होण्याची गरज आहे. हे प्रमाण कमी व्हावे असे सरकार आणि रिझव्र्ह बँक मान्य करते. पण, त्या दिशेने काही होत नाही. त्यामुळे देशातील काळ्या पैशांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे उच्च मूल्य असलेल्या नोटांचे प्रमाण कमी करण्याविषयीचा एक कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Story img Loader