भीषण दुष्काळाने होरपळणाऱ्या नागरिकांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी आता सप्तसूर पुढे सरसावले आहेत! ‘आर्य संगीत प्रसारक मंडळा’ तर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी येत्या ५ मे रोजी ‘संवेदना’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीतून मिळणारे उत्पन्न मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीला देण्यात येणार आहे.
मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते १० अशा दोन सत्रांत ही मैफल होणार आहे. पहिल्या सत्रात प्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार, पं. उल्हास कशाळकर आणि पं. राजन व पं. साजन मिश्रा आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. सायंकाळच्या सत्रात प्रथम प्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांचे व्हायोलिनवादन होईल. तर सत्राचा समारोप गानसरस्वती पंडिता किशोरी आमोणकर यांच्या गायनाने होणार आहे.
श्रीनिवास जोशी म्हणाले, ‘ज्यांच्यासमोर कला सादर करायची ते रसिकच संकटात असताना त्यांच्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. या भावनेतूनच या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उत्पन्न दुष्काळ निधीस देण्यात येणार असले तरी कलाकारांच्या मानधनात तडजोड करण्यात आलेली नाही.’
ही मैफल न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागच्या पटांगणात होणार असून त्यासाठीच्या देणगी प्रवेशिका नावडीकर म्युझिकल्स, शनिपारजवळील बेहरे आंबेवाले, लक्ष्मी रस्त्यावरील दिनशॉ अँड कंपनी आणि कमला नेहरू उद्यानासमोरील शिरीष ट्रेडर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. खुर्चीसाठी दोन हजार, अठराशे आणि पंधराशे रुपयांच्या देणगी प्रवेशिका उपलब्ध असून, भारतीय बैठकीसाठी देणगी प्रवेशिकेचा दर सहाशे रुपये असणार आहे. केवळ एकाच सत्रासाठीच्या देणगी प्रवेशिकाही उपलब्ध असून, त्याचा खुर्चीसाठीचा दर आठशे रुपये व भारतीय बैठकीसाठीचा दर चारशे रुपये असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To help for famine stricken sauvedana concert by aarya sangeet prasarak mandal