पिंपरी: शहरात प्रशस्त रस्ते असूनही वाहतूककोंडी होत आहे. तसेच, लहान व मोठ्या अपघातांची संख्या कायम आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षित व्हावे म्हणून महापालिका शहरातील वर्दळीच्या चौकांचे, रस्त्यांचे परीक्षण करणार आहे. परीक्षणानंतर आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहराचे कार्यक्षेत्र १८१ चौरस किलोमीटर आहे. शहरात १३०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. शहरालगत चाकण, तळेगाव औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञाननगरीचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मध्यवर्ती शहर म्हणून पिंपरी-चिंचवड विकसित होत आहे. लोकसंख्येच्या मानाने खासगी वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील प्रशस्त रस्ते वाहतुकीस अपुरे पडत आहेत. मॉल, हॉटेल, मंगल कार्यालये, भाजी मंडई, चित्रपटगृहे, रुग्णालये, उद्याने, बस स्थानके, व्यापारी संकुल, चौक आदी ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या वाढत आहे. तसेच प्रत्येक मोठ्या चौकात वाहतूक नियंत्रण (सिग्नल) यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, चौकातील व्यावसायिक अतिक्रमण, वाहनांचे बेकायदा पार्किंग, विक्रेत्यांची वाढती संख्या आदी कारणांमुळे कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत.

हेही वाचा… पुण्याची हवा अद्याप ‘अपायकारक’ पातळीवर!

शहरातील प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडीचीही समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका शहरातील मुख्य चौक, रस्त्यांचे सर्वेक्षण करणार आहे. त्यात रस्ता सुरक्षा परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी स्ट्रीट सर्ज टेक्नॉलॉजिस या संस्थेची नेमणूक केली आहे. या नवीन कामाचे लेखाशीर्ष तयार करून ५० लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. तो निधी कमी पडत असल्याने त्यात दहा लाखांची वाढ करण्यात आली आहे. या वर्गीकरणास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

शहरातील विविध भागांत प्रशस्त चौक आहेत. मात्र, त्यानंतरही बहुतांश चौकांत वाहतूककोंडी होते. चौकांतील अडथळे दूर करून सुरक्षित वाहतूक रहदारी करण्यासाठी खासगी संस्था नेमून परीक्षण केले जाणार आहे. परीक्षणानंतर प्राप्त झालेल्या अहवालानंतर तशा सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे चौकांमधील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. – प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To make the roads safe the pcmc is going to inspect the busy squares and roads in pimpri pune print news ggy 03 dvr
Show comments