विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : रंगभूमीवर पहिल्यांदाच प्रभाकर पणशीकर या एका अभिनेत्याने साकारलेल्या पाच वैविध्यपूर्ण भूमिका आणि फिरता रंगमंच असे नावीन्य असलेले ‘तो मी नव्हेच’ हे नाटक शुक्रवारी (८ ऑक्टोबर) साठीमध्ये पदार्पण करीत आहे. ‘तो मी नव्हेच’च्या नव्या संचामध्ये प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक हे गेल्या १२ वर्षांपासून लखोबा लोखंडेसह पाचही भूमिका साकारत आहेत.

विजयादशमीच्या मुहूर्तावर ८ ऑक्टोबर १९६२ रोजी दिल्लीच्या आयफॅक्स नाट्यगृहात ‘तो मी नव्हेच’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला होता. ही घटना शुक्रवारी साठाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे.  या नाटकामध्ये लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, कॅ. अशोक परांजपे, दाजीशास्त्री दातार आणि राधेश्याम महाराज अशा पाच भूमिका पणशीकर यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केल्या. एकाच कलाकाराने रंगमंचावर पाच वेगवेगळ्या भूमिका साकारलेले हे त्या काळी जागतिक रंगभूमीवरही आश्चर्य ठरले होते. विजयादशमीला शुभारंभाचा प्रयोग झालेल्या या नाटकाने यशाचे सीमोल्लंघन केले. तीन हजारांहून अधिक प्रयोगांमध्ये पंचरंगी भूमिका साकारणाऱ्या पणशीकर यांना या नाटकाने नावलौकिक प्राप्त करून दिला. या नाटकाच्या गुजराती आणि कन्नड भाषेतील प्रयोगांमध्येही प्रभाकर पणशीकर भूमिका साकारल्या. 

मो. ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन संस्थेतर्फे ‘तो मी नव्हेच’ नाटक रंगभूमीवर आले. त्यानंतर अत्रे थिएटर्स संस्थेने नाटकाची निर्मिती केली. पणशीकर यांच्या नाट्यसंपदा संस्थेने नाटकाचे दीर्घकाळ प्रयोग केले. ‘तो मी नव्हेच’च्या दोनशे प्रयोगांनंतर कोल्हापूर येथील सादबा मिस्त्री यांच्याकडून फिरत्या रंगमंचाची निर्मिती करण्यात आली. हे या नाटकाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले होते. ‘तो मी नव्हेच’ हा संवाद रंगमंचावर सादर करणाऱ्या पणशीकर यांनी आपला नाट्यप्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाचे लेखन केले तेव्हा पुस्तकाचे नाव ‘तोच मी’ असे ठेवले होते.

संयुक्त प्रयोग न झाल्याची खंत

‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये मी भूमिका करायचे ठरवले, तेव्हा पणशीकर यांनी मला धीर दिला होता. या नाटकामध्ये मी अग्निहोत्री ही व्यक्तिरेखा साकारत होतो. त्याचे मी जवळपास पावणेदोनशे प्रयोग केले होते. हे नाटक पेलेल का, असा प्रश्न पडला होता तेव्हा ‘तू माझी नक्कल करू नको’ असे पणशीकर यांनी मला सांगितले. आठ दिवस ते तालमीला येत होते. २००८ मध्ये मी या नाटकाचे प्रयोग सुरू केले. पणशीकर यांनी प्रास्ताविक करून हे नाटक माझ्याकडे सुपूर्द केले. नाटक संपल्यानंतर राधेश्याम महाराजांचा प्रवेश माझ्यापेक्षा चांगला केला, असा अभिप्राय त्यांनी दिला होता.  ‘न्यायालयातील प्रवेश मी करेन आणि उर्वरित प्रवेश तू कर,’ असा संयुक्तपणे शंभरावा प्रयोग करू, असे पणशीकर यांनी सुचविले होते. मात्र, ९६ प्रयोगांनंतर त्यांचे निधन झाले. हा संयुक्त प्रयोग होऊ शकला नाही, ही खंत अजूनही माझ्या मनात आहे. – डॉ. गिरीश ओक, प्रसिद्ध अभिनेते

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To mee navhech marathi drama debut in 60 year zws