पुणे : सरकारी कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी स्थूलत्व उपचार व प्रतिबंध अभियान राबविण्यास ससूनने सुरुवात केली आहे. याअंतर्गत १६० सरकारी कर्मचाऱ्यांची स्थूलता तपासणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारच्या स्थूलत्व जनजागृती व प्रतिबंध अभियानांतर्गत ससून रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे. मुख्य टपाल कार्यालय, समाज कल्याण आयुक्त कार्यालय आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालय येथील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्थूलत्व तपासणी करण्यात आली. यात ससूनच्या वैद्यकीय पथकाने सरकारी कर्मचाऱ्यांची वजन, उंची, रक्तदाब आणि रक्तशर्करा तपासणी केली. एकूण १६० कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्थूल आढळलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय पथकाने समुपदेशन केले. त्यांना स्थूलपणाला प्रतिबंध कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे मेट्रोच्या कामात सरकारी भांडणाचा खोडा ! १५ दिवसांपासून काम बंद

आगामी काळात इतरही सरकारी कार्यालयांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. देशात १५ ते ५० वर्षे वयोगटात स्थूलत्वाचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. स्थूलत्वाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काटेकोर आहार आणि नियमित व्यायामाची गरज आहे, असे स्थूलत्व उपचार व प्रतिबंध अभियानाचे समन्वय अधिकारी डॉ. हरीश उम्रजकर यांनी सांगितले. ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. डॉ. हरीश उम्रजकर, डॉ. हर्षल भीतकर, डॉ. नेहा सूर्यवंशी आणि इतर डॉक्टर व परिचारिकांनी यात सहभाग घेतला.

स्थूलत्वावर ससूनमध्ये उपचार उपलब्ध आहेत. रुग्णांचे समुपदेश आणि अद्ययावत शस्त्रक्रिया ससूनमध्ये मोफत केल्या जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्थूलत्व तपासणीसाठीही आम्ही अभियान राबवित आहोत. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To reduce obesity in government employees sassoon hospital initiative pune print news stj 05 ysh
Show comments