लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: भोसरी विधानसभा मतदार संघातील समाविष्ट गावांसह औद्योगिक पट्ट्यातील वीज समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महावितरण प्रशासनाकडून आकुर्डी आणि भोसरी उपविभागाचे विभाजन भोसरी एक आणि भोसरी दोन असे करण्यात येणार आहे. तसेच तीन नवीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

महावितरणच्या भोसरी विभागांतर्गत औद्योगिक आणि घरगुती असे तीन लाख ७० हजार वीजग्राहक आहेत. एका शाखा कार्यालयांतर्गत १६ तांत्रिक कर्मचारी ४० ते ६० हजार ग्राहकांना सेवा देण्यासाठी कार्यरत असतात. ग्राहक संख्या जास्त असल्यामुळे वीजसमस्या आणि तांत्रिक अडचणींच्या तक्रारी वाढल्या आहेत. भौगोलिक कार्यक्षेत्र आणि वीज मागणीचा विचार करता भोसरीगाव व आकुर्डी विभागाचा काही भाग, असे विभाजन करुन नव्या उपविभागाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पाइन सिटी, इंद्रायणीनगर आणि चिखली शाखा कार्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीत अतिरिक्त कर्मचारी वर्ग मिळणार आहेत.

हेही वाचा… पुणे: अनंत चतुर्दशीनंतर मार्केट यार्ड सलग दोन दिवस बंद

मोशी आणि संभाजीनगर शाखा कार्यालयाअंतर्गत दीड लाख ग्राहकांना सेवा देण्यासाठी केवळ ३२ कर्मचारी होते. नवीन शाखा कार्यालयाच्या निर्मितीमुळे ती संख्या ४८ पर्यंत जाणार आहे. त्यामुळे ग्राहक सेवा सुधारणार आहे. चिखलीगाव परिसरात २९ हजार वीज ग्राहक आहेत. नवीन शाखा कार्यालयामुळे या ठिकाणी अतिरिक्त १६ कर्मचारी उपलब्ध होणार आहेत.

भोसरीत औद्योगिकरण आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. त्यासाठी आकुर्डी व भोसरी उपविभागाचे विभाजन करण्यात येणार आहे. वीजेची समस्या सुटण्यास मदत होईल. – महेश लांडगे, आमदार, भोसरी

Story img Loader