‘‘देशातील तरूण पिढीत तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले असून दर चाळीस सेकंदांना एका व्यक्तीचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. २०२० साली सर्वाधिक मृत्यू तंबाखूच्या कारणामुळेच असतील. मी आरोग्य मंत्री असताना तंबाखूविरोधात जागृती मोहीम सुरू केली होती. त्यानंतर माझे खाते बदलण्यात आले, त्यात तंबाखू लॉबीचा हात होता, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी रविवारी केला.
   ‘रेसिडन्सी क्लब’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे प्राईड पुरस्कार’ सोहळ्यात सिन्हा आणि अभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या हस्ते प्रसिद्ध सराफी व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले, सामाजिक कार्यकर्त्यां अरमीन मोदी, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, गायक संजीव अभ्यंकर आदिंना सिन्हा व धिल्लन यांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तर, ज्येष्ठ उद्योजक बाहरी मल्होत्रा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सल्लागार मंडळाचे अध्यक्ष नाना चुडासामा, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक शां. ब. मुजुमदार, क्लबचे अध्यक्ष आर. के. अगरवाल या वेळी उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले, ‘‘मीदेखील पूर्वी सिगारेट ओढत असे. मात्र सिगारेटच्या सेवनामुळे चित्रपटातील मारामारीचे प्रसंग चित्रित करताना माझा दम कमी पडतो आहे असे लक्षात आल्यावर मी सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे आरोग्य मंत्री झाल्यावर तंबाखूच्या दुष्परिणामांचे गांभीर्य माझ्या लक्षात आले आणि मी त्याविरोधात जागृती मोहीम सुरू केली. मला आरोग्य मंत्री पदावरून हटवण्यातही तंबाखू लॉबीचाच हात होता. देशातील तरूण पिढीत तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांना या व्यसनापासून परावृत्त करणे आवश्यक आहे.’’

Story img Loader