गुगलने आयोजित केलेल्या डुडल फॉर इंडिया स्पर्धेमध्ये पुण्याच्या गायत्री केथरामन हिला देशात प्रथम पारितोषिक मिळाले असून गुरुवारी (१४ नोव्हेंबर) गायत्रीने तयार केलेले डुडल दिसणार आहे.
गुगलकडून २००९ सालापासून ‘डुडल फॉर इंडिया’ ही स्पर्धा घेतली जाते. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेतली जाते. या वर्षी या स्पर्धेसाठी ‘सेलिब्रेटिंग इंडियन वुमन’ या संकल्पनेवर डुडल तयार करायचे होते. पुण्यातील गायत्री केथरामन या विद्यार्थिनीला या स्पर्धेमध्ये तिन्ही गटांमधून देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. गायत्री पुण्यातील बिशप्स कोएड स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गायत्रीने केलेले डुडल बालदिनी गुगलच्या होमपेजवर प्रसिद्ध केले जाणार आहे.
पहिली ते तिसरीच्या गटामध्ये लखनऊमधील मधुरम वत्सल, चौथी ते सहावीच्या गटामध्ये ओडीसामधील बोलसार येथील विनिता विश्वजित आणि सातवी ते दहावीच्या गटामध्ये मंगळूर येथील आकाश शेट्टी हा विद्यार्थी पहिला आला आहे. या वर्षी या स्पर्धेमध्ये देशभरातील दीड लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातून बारा विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. अभिनेत्री किरण खेर आणि अजित निनाण यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले होते.

Story img Loader