पुणे : मिळकतकरातील ४० टक्क्यांची सवलत प्राप्त करण्यासाठीची मुदत संपत आल्याने अर्ज भरण्यासाठी मिळकतधारकांनी महापालिका भवन आणि क्षेत्रीय कार्यालयात मोठ्या संख्येने गर्दी केली. सवलतीसाठीचा अर्ज भरण्यासाठीची आज (गुरुवार, ३० नोव्हेंबर) अंतिम मुदत असून बुधवारी सायंकाळपर्यंत १ लाख मिळकतधारकांनी अर्ज भरल्याची माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, अद्यापही सव्वादोन लाख मिळकतधारकांनी अर्ज भरलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील निवासी मिळकतींना वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत १ एप्रिल २०२३ पासून रद्द करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले होते. त्यामुळे ही सवलत कायम ठेवावी, असा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. त्याला मंत्रिमंडळाने आणि त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनातही मंजुरी मिळाली होती. सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात काहीसा विलंब झाल्याने यंदा मिळकतकराची नियमित देयके देण्यासही उशीर झाला होता. तसेच ज्या सव्वातीन लाखांहून अधिक मिळकतधारकांची ही सवलत रद्द करण्यात आली आहे, त्यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे अर्ज करावा, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी १५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र अर्ज न आल्याने तो सादर करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये आणि मुख्य भवनात अर्ज दाखल करण्यासाठी मिळकतधारकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. मिळकतधारकांना ते स्वतः राहात असलेल्या सदनिकेचे पुरावे आणि पीटी ३ अर्ज भरून जवळच्या क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षकांकडे २५ रुपये शुल्क भरून जमा केले. अद्यापही सव्वादोन लाख मिळकतधारकांनी सवलतीसाठी अर्ज केले नसल्याचा कर आकारणी आणि कर संकलन विभागाचा अंदाज आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची नारायण राणे यांची मागणी : म्हणाले, ‘दंगली होतील हे आंबेडकरांना…’

हेही वाचा – पिंपरी : मोठ्याने शिव्या दिल्याचा विचारला जाब; पेट्रोल टाकून महिलेची जाळली दुचाकी…

कोणी अर्ज करावा ?

शहरात समाविष्ट गावासंह १२ लाख ५३ हजार मिळकतींची नोंद महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे आहे. या सर्वांना मिळकतकराची देयके देण्यात आली आहे. मात्र यातील सव्वातीन लाखांहून अधिक मिळकतधारकांची ४० टक्क्यांची सवलत रद्द करण्यात आली होती. त्यानुसार सव्वातीन लाखांहून अधिक मिळकतधारकांनी थकबाकीच्या रकमेसह कर भरणा केला होता. या मिळकतधारकांची सवलत कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना वाढीव मिळकतकराचे देयक आले आहे, त्यांनीच पीटी ३ अर्ज भरणे बंधनकारक आहे. ज्या मिळकतींना वाढीव देयक मिळालेले नाही, त्यांनी सवलतीसाठी अर्ज करणे आवश्यक नाही. त्यांना यापूर्वीच ही सवलत देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is the last day to get 40 percent discount on property tax pune print news apk 13 ssb