मराठी चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग पाहण्याचे भाग्य लाभलेला मूक साक्षीदार आणि मराठी चित्रपटगृहांचे माहेरघर असा नावलौकिक लाभलेल्या पूर्वीचे प्रभात चित्रपटगृह म्हणजेच ‘किबे लक्ष्मी थिएटर’ची वाटचाल अस्ताकडे सुरू झाली आहे. एकपडदा चित्रपटगृह चालकांसमोरील अडचणी आणि कौटुंबिक समस्यांमुळे किबे कुटुंबीय हे चित्रपटगृह विकण्याच्या मन:स्थितीमध्ये आहेत. टाळेबंदीपासून हे चित्रपटगृह बंदच असून हे काळाच्या पडद्याआड जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी चित्रपटांसाठीचे पुण्यातील हक्काचे ठिकाण असलेले किबे लक्ष्मी थिएटर बुधवारी (२१ सप्टेंबर) स्थापनेची ८८ वर्षे पूर्ण करीत आहे. १० जानेवारी २०१५ पासून या चित्रपटगृहाचा ताबा किबे कुटुंबीयांकडे आला. त्यानंतर दुरुस्तीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आलेले चित्रपटगृह करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीपर्यंत पुणेकरांच्या मनोरंजन सेवेत कार्यरत होते. टाळेबंदी शिथिल करताना शासनाने ५० टक्के आसनक्षमतेमध्ये चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने एकपडदा चित्रपटगृहचालकांनी चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून किबे लक्ष्मी थिएटर बंदच आहे.

हेही वाचा : दर्जाचा आग्रह धरणे स्वागतार्ह! ; पुरुषोत्तम करंडकच्या निकालाबाबत ज्येष्ठ रंगकर्मी, नाटय़समीक्षक माधव वझे यांची परखड भूमिका

आम्ही इंदूर येथे वास्तव्यास आहोत. माझे बंधू सुरेश किबे यांचे दीड वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयोमानानुसार माझीही प्रकृती बरी नसते. प्रवास करणे झेपत नाही. त्यामुळे हे चित्रपटगृह विकण्याचा विचार करत आहे, असे चित्रपटगृहाचे मालक अजय किबे यांनी सांगितले. एकपडदा चित्रपटगृहचालकांसमोर अडचणी आहेतच. पण, कौटुंबिक समस्यांमुळे आता चित्रपटगृह चालवू नये, अशी मन:स्थिती झाली असल्याचे किबे यांनी सांगितले.

चित्रपटगृहाचा इतिहास

इंदूर येथील संस्थानिक रामचंद्र किबे यांनी पत्नी लक्ष्मी यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशातून २१ सप्टेंबर १९३४ मध्ये ‘किबे लक्ष्मी थिएटर असे या चित्रपचगृहाचे नामकरण केले होते. मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीच्या भागीदारांनी हे चित्रपटगृह चालविण्यासाठी घेतले आणि प्रभात फिल्म कंपनीवरून या चित्रपटगृहाचे प्रभात असे नामकरण करण्यात आले होते. या भागीदारांपैकी विष्णुपंत दामले यांचे नातू विवेक दामले यांच्याकडे चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी होती. कराराची मुदत संपुष्टात आल्यामुळे हे चित्रपटगृह १० जानेवारी २०१५ रोजी सरदार किबे यांचे नातू अजय किबे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले.

हेही वाचा : पैशांच्या तगाद्यामुळे अधिकाऱ्याची आत्महत्या ; चौघे अटकेत

चित्रपटगृहाची वैशिष्ट्ये

  • चित्रपटगृहापूर्वी येथील नाट्यगृहामध्ये बालगंधर्व यांच्या नाटकांचे प्रयोग
  • गेल्या ८५ वर्षांत १३०० हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन
  • ‘लव्ह मी टू नाइट’ हा पहिला इंग्रजी तर, ‘अमृतमंथन‘ हा पहिला मराठी चित्रपट
  • सलग अडीच वर्षे चाललेला ‘माहेरची साडी’ हा चित्रपट
  • जितेंद्र, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्या भूमिका असलेला ‘तोहफा’ हा दीर्घ काळ चाललेला शेवटचा हिंदी चित्रपट
  • अनेक चित्रपटांचे सुवर्णमहोत्सवी आणि रौप्यमहोत्सवी आठवडे साजरे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today kibe lakshmi theatres anniversary pune print news tmb 01