महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा विविध संघटना, संस्था, राजकीय पक्षांनी निषेध केला असून डॉ. दाभोलकरांच्या हल्लेखोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. जादूटोणाविरोधी विधेयक संमत करणे हीच डॉ. दाभोलकर यांनी श्रद्धांजली ठरेल असे मतही संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला असून गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही पत्रकार संघातर्फे करण्यात आली आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेही डॉ. दाभोलकर यांना अॅड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, मोहन जोशी आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करून गुन्हेगारांना लवकरच जेरबंद करण्यात येईल, अशी अपेक्षा भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, आर.पी.आय. ओबीसी सेल महाराष्ट्र, शिव संग्राम, लहुजी महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, प्रबोधन पुणे, दीपक कुदळे अँड असोसिएट्स, दलित सेना, भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन, वंदे मातरम् विद्यार्थी संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, कॉमन मॅन वेलफेअर असोसिएशन ऑफ इंडिया, मानव अधिकार आणि नागरी हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र, सर्व धर्मीय, सर्व पंथीय सामाजिक परिषद आणि युवा भारत, भारिप बहुजन महासंघ, जय भवानी टेक्निकल इन्स्टिटय़ूट, भारिप बहुजन महासंघ सम्यक विद्यार्थी आंदोलन, अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था, रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संघमित्रा गायकवाड, पुणे शहर काँग्रेसच्या कॅन्टोन्मेंट ब्लॉक कमिटीचे सेक्रेटरी आयाझ पठाण, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार सुरेश कलमाडी यांनीही डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रॅली आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्ह बुधवारी (२१ ऑगस्ट) रॅलीचे आयोजन करण्यात आले असून पुण्यातील विविध महाविद्यालये आणि वसतिगृहांमधील विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. साधना मीडिया सेंटरपासून सकाळी ९ वाजता ही रॅली सुरू होणार असून ओंकारेश्वर चौक, बालगंधर्व मार्गे पुणे मनपाला पोहोचणार आहे. सर्व पक्षीय संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये ही युवकांची रॅली सहभागी होणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृहामध्ये निषेध सभा आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा