महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (३० मे) घेणार असून नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकाचीही तपासणी ते या वेळी करणार असल्यामुळे नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा थेट साहेबांसमोरच सादर होणार आहे.
पुणे शहराच्या प्रश्नांबाबत तसेच पक्षबांधणीसंबंधी राज ठाकरे यांनी आतापर्यंत दोन-तीन वेळा नगरसेवकांच्या बैठका घेतल्या होत्या. मात्र, गुरुवारी सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले असून सुमारे दोनशे जण या बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पदाधिकारी बैठकीपूर्वी सर्व नगरसेवकांची बैठक सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.
महापालिकेत निवडून आलेल्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचे काम राज यांच्या आदेशानुसार करण्यात आले असून वर्षभरात वॉर्डस्तरीय निधीतून कोणकोणती कामे नगरसेवकांनी केली तसेच त्यांचा किती निधी खर्च झाला, किती शिल्लक राहिला याचाही तपशील राज यांनी मागवला आहे. नगरसेवकांच्या वार्षिक कामगिरीचा हा अहवाल पक्षाचे महापालिकेतील गटनेता वसंत मोरे यांनी तयार केला असून तो राज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. नगरसेवकांच्या गुरुवारी होत असलेल्या बैठकीत या अहवालावर चर्चा अपेक्षित असून त्यातून प्रत्येकाच्या कामगिरीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पक्षाने बोलावलेल्या आतापर्यंतच्या बैठकांना प्रत्येक नगरसेवकाची उपस्थिती वर्षभरात कशाप्रकारे राहिली, कोण किती बैठकांना उपस्थित होते, याचाही तपशील राज यांनी मागवला होता. तो तपशीलही या अहवालात देण्यात आला आहे.
या प्रगतिपुस्तकाबरोबरच पक्षाचे गटनेता वसंत मोरे, तसेच नगरसेवक रवींद्र धंगेकर, बाळा शेडगे, बाबू वागसकर, किशोर शिंदे, राजाभाऊ बराटे या प्रमुखांनाही अहवाल देण्याबाबत सांगण्यात आल्याचे समजते. वर्षभरातील कामगिरी तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत काय केले, कोणते कार्यक्रम राबवले, कोणते कार्यक्रम पुढे राबवणार या संबधीचा हा अहवाल दोन दिवसांत द्या, अशीही सूचना राज यांनी प्रमुख नगरसेवकांना दिली आहे.
मनसे नगरसेवकांची कामगिरी; राज ठाकरे आज बैठक घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी (३० मे) घेणार असून नगरसेवकांच्या प्रगतिपुस्तकाचीही तपासणी ते या वेळी करणार आहेत.
First published on: 30-05-2013 at 02:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today mns meeting for progress book of corporators