पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात बुधवारचा दिवस पावसाचाच ठरला. शहर आणि परिसरात विविध भागात सकाळपासूनच पावसाची हजेरी होती. या कालावधीत काही भागांत मुसळधारा कोसळल्या. दिवसभराच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहन चालकही हैराण झाले. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारीही शहर आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

हेही वाचा : भाजपकडून बारामती, मुंबईसाठी कोणतेही ‘मिशन’ नाही – बावनकुळे; एकनाथ शिंदे गटाचे सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची

शहरात दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. मंगळवारीही दिवसभरात पावसाच्या दोन ते तीन मोठ्या सरी कोसळल्या. रात्री काही भागांत अतिवृष्टीप्रमाणे पाऊस झाला. बुधवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. संध्याकाळी पाचनंतर सुमारे अर्धा तास शहराच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. सकाळपासूनच्या पावसाने सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. त्यातच मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने सर्वच प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शहराबरोबरच जिल्ह्यातही विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली. शहरालगतच्या घाटविभागांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहर आणि परिसरामध्ये पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाट विभागांमध्ये या काळात काही भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Story img Loader