मनावर परिणाम करणाऱ्या कसदार साहित्याचा प्रभाव हे दिवाळी अंकांचे वैशिष्टय़ लुप्त होत आहे, अशी खंत प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी व्यक्त केली. दिवाळी अंक ही सामूहिक कलाकृती असून सकस अंकाच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत मतभेद आणि अहंकार दूर ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
दिवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी अंकाच्या संपादकांच्या अधिवेशनाचे उद्घाटन कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष कृष्णुकमार गोयल यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ढेरे बोलत होत्या. ‘ग्राहकहित’चे संपादक सूर्यकांत पाठक, ‘ग्रहांकित’चे संपादक चंद्रकांत शेवाळे, ‘पद्मगंधा’चे संपादक अरुण जाखडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय पाध्ये आणि ‘आक्रोश’चे संपादक ज्ञानेश्वर जराड या प्रसंगी उपस्थित होते.
दिवाळी अंक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैशिष्टय़पूर्ण अंग आहेत, असे सांगून डॉ. ढेरे म्हणाल्या, एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे.
गोयल म्हणाले, लक्ष्मीची अपेक्षा न ठेवता दिवाळी अंकांचे संपादक सरस्वतीची सेवा करीत आहेत. नवीन लेखक-कवींना प्रकाशात आणण्याचे काम दिवाळी अंकांच्या माध्यमातून झाले आहे.
या वेळी चंद्रकांत शेवाळे आणि ज्ञानेश्वर जराड यांनी मनोगत व्यक्त केले. अरुण जाखडे यांनी आभार मानले.

Story img Loader