राज्यातील शाळांपाठोपाठ आता महाविद्यालयांमध्येही विद्यार्थिनी किंवा महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे आहेत का, याची पाहणी सुरू झाली आहे. पन्नास विद्यार्थिनींसाठी एक याप्रमाणे स्वच्छतागृहे असावीत, अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्षणसंस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे उपलब्ध असण्याबाबत मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार आता राज्यातील शाळांनंतर महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे आहेत का, त्यांची स्वच्छता कशी राखली जाते याबाबत माहिती गोळा केली जात आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने याबाबत महाविद्यालये आणि विद्यापीठांकडे माहिती मागवली आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये पन्नास महिलांसाठी एक स्वच्छतागृह असावे, असा निकष विभागाने घातला आहे.
महाविद्यालयात एकूण विद्यार्थिनी किती आहेत, महिला कर्मचारी किती आहेत, शिक्षिका किती आहेत, त्यांच्यासाठी किती स्वच्छतागृहे आहेत, सध्या महाविद्यालयांत पुरेशी स्वच्छतागृहे नसल्यास ती बांधण्याची काही योजना आहे का, अशी माहिती विभागाने मागवली आहे. महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नसतील, तर ती उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करून त्याचा अहवाल विभागाला पाठवण्यात यावा, अशी सूचनाही महाविद्यालयांना देण्यात आली आहे. स्वच्छतागृहांच्या उपलब्धतेबरोबरच त्यांच्या स्वच्छतेबाबतही माहिती गोळा करण्यात येत आहे. सध्या स्वच्छता राखण्यासाठी काय उपाय केले जातात, स्वच्छता राखण्याचे काम खासगी तत्त्वावर स्वतंत्र संस्थेला देणे शक्य आहे का, याची चाचपणीही करण्यात येत आहे.

Story img Loader