पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या शहर स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी परिसरातील स्वयंसेवी संस्था, उद्योजक व बांधकाम व्यावसायिकांची आर्थिक मदत घेण्यात येणार आहे. याकरिता आवश्यक धोरण निश्चित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
शहरातील गर्दीचे चौक, बसथांबे, भाजीमंडई अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार तसेच आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांचे चार वेगवेगळे प्रकार ठरवण्यात आले आहेत. प्रस्तावित स्वच्छतागृहे स्वंयसेवी संस्था, बांधकाम व्यावसायिक तसेच उद्योजकांच्या खर्चाने बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार, ६४ स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येणार आहेत. त्यातील १७ ठिकाणी बांधकाम व्यावसायिक तर १२ ठिकाणी स्वंयसेवी संस्थांनी स्वच्छतागृहे बांधण्याची तयारी दर्शवली आहे. नगरसेवकांनी सुचवलेल्या काही जागांवरही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी नव्याने जाहीर प्रकटन देण्यात येणार आहे. तत्पूर्वी, यासंदर्भात, महापालिकेचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी याबाबतचा प्रस्ताव सहा मे ला होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पूर्णपणे उठवण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याचा निर्णय होणार की १६ मे पर्यंत वाट पाहावी लागणार, याविषयी साशंकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा