केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत आणि राज्य शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ महाराष्ट्र या अभियानांतर्गत शहरात सात हजार ५३५ स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी घेतला. मार्च २०१६ अखेर ही स्वच्छतागृह बांधली जातील. त्यासाठी पाच कोटी ३० लाख रुपये खर्च येणार असून ही रक्कम वर्गीकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या निर्णयाची माहिती स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, शहरात २८ हजार कुटुंबांकडे स्वच्छतागृह नाही. या कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपाचे स्वच्छतागृह बांधण्यासाठी महापालिकेकडून अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.
स्वच्छतागृहाच्या बांधणीसाठी केंद्र सरकारकडून चार हजार रुपये, राज्य शासनाकडून आठ हजार रुपये आणि महापालिकेकडून सहा हजार रुपये एवढे अनुदान दिले जाईल. लाभार्थी कुटुंबाला चार हजार रुपये द्यावे लागतील. त्या पुढील टप्प्यात २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत शहरात २८ हजार ५७२ स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी महापालिकेला १७ कोटी १४ लाख रुपये एवढा खर्च येईल.

Story img Loader