पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलमध्ये १ एप्रिलपासून १८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तीन वर्षांची ही एकत्रित वाढ करण्याचा हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच इंधन दरवाढीमुळे जेरीस आलेल्या वाहनचालकांना आता वाढीव टोलचा भुर्दंड बसणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगाव, शेडूंग, कुसगाव आणि खालापूर असे चार टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवर जानेवारी महिन्यात एकूण ४० लाख वाहनांनी ये-जा केली. या वाहनांकडून सध्याच्या टोलदरानुसार सुमारे १०३ कोटी रुपयांचा टोल जमा करण्यात आला. टोलच्या वसुलीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मार्गावरील एकूण टोल वसुली सप्टेंबर २०१९ मध्ये ६० कोटी रुपये होती. त्यामध्ये सुमारे साडेतीन वर्षांत ४३ कोटी रुपयांनी वाढ झाली.
हेही वाचा >>> लिंगाना किल्ल्याच्या पायथ्याशी गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
टोलचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. मोटारचालकांना सध्या २७० रुपये टोल असून, तो आता ३२० रुपये होईल. सुधारित टोल बससाठी ९४० रुपये, टेम्पोसाठी ४९५ रुपये आणि मालमोटारीसाठी ६८५ रुपये असेल. थ्री ॲक्सल वाहनांचा १ हजार ६३० आणि मल्टी ॲक्सल वाहनांना २ हजार १६५ रुपये टोल असेल.
टोल दरवाढीला विरोध
महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या टोल दरवाढीला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. या दरवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ते म्हणाले की, या निर्णयाचा माल व प्रवासी वाहतूक करणारी व्यावसायिक वाहने व खासगी वाहनधारकांना फटका बसणार आहे. तीन वर्षांची दरवाढ एकाचवेळी करु नये. करोनानंतर आता देशातील माल व प्रवासी वाहतूकदार, खासगी वाहनचालक सावरत आहेत. त्यांना ही वाढ परवडणारी नाही. फक्त ९४ किलोमीटरच्या मार्गावर ही वाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा.
मुबंई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोल
वाहनाचा प्रकार जुना टोल नवीन टोल
मोटार २७० ३२०
बस ७९७ ९४०
टेम्पो ४२० ४९५
मालमोटार ५८० ६८५
थ्री अॅक्सल १३८० १६३०
मल्टी ॲक्सल १८३५ २१६५