पुणे : राज्यातील टोमॅटो पट्ट्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे. हे टोमॅटो पंधरा ऑगस्टनंतर बाजारात येण्याची शक्यता असून, त्यानंतर टोमॅटोचे दर आवाक्यात येतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.राज्यात प्रामुख्याने नारायणगाव (पुणे), सातारा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर व नागपूर जिल्ह्यांमध्ये टोमॅटोची लागवड होते. सध्या नारायणगाव, नाशिक परिसरात लागवडी वेगाने सुरू आहेत. रोप लागणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी टोमॅटोची काढणी सुरू होते. त्यामुळे नव्याने लागवड केलेला टोमॅटो बाजारात येण्यास पंधरा ऑगस्ट उजाडणार आहे. त्या नंतरच टोमॅटोचे दर उतरतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
हेही वाचा >>>भाजपच्या पुणे शहराध्यक्षाचे नाव निश्चित…’यांपैकी’ एकाची होणार निवड
खरिपात ४० हजार हेक्टरवर टोमॅटो
राज्यातील टोमॅटो पिकाखाली क्षेत्र सुमारे ५६ ते ५७ हजार हेक्टर आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर, रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली जाते. राज्यात सर्वसाधारणपणे वर्षाला १० लाख टन टोमॅटो उत्पादन अपेक्षित असते. डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला अत्यंत कमी दर मिळाला. दर आणि मागणीअभावी शेतकऱ्यांना मे महिन्यात टोमॅटो रस्त्यांवर फोकून द्यावा लागला होता. त्यामुळे पिकाच्या नवीन लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दरवाढीनंतर नव्या लागवडी सुरू झाल्या आहेत. मात्र, मोसमी पावसाने राज्याच्या बहुतेक भागात ओढ दिल्यामुळे भाजीपाल्यांच्या लागवडीवर परिणाम होताना दिसत आहे. चांगला पाऊस झाल्यास, पिकाला वातावरण पोषक राहिल्यास पंधरा ऑगस्टनंतर टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल.