पुणे : पंधरा ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना टोमॅटोला प्रति किलो १५० ते २०० रुपये दर मिळत होता. तो आता पाच ते सात रुपयांवर आला आहे. बाजार समित्यांमधून मागणीच नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो रस्त्यांवर फेकून देत आहेत. टोमॅटो अक्षरक्ष: कवडीमोल दराने विकला जात आहे. संपूर्ण जून, जुलै महिना आणि पंधरा ऑगस्टपर्यंत देशभरात टोमॅटोचे दर चढे होते.
शेतकऱ्यांना सरासरी १५० ते २०० रुपये दर मिळत होता. केंद्र सरकारला नेपाळमधून टोमॅटो आयात करावी लागली. केंद्राला सरकारी यंत्रणेमार्फत टोमॅटो खरेदी करून राजधानी दिल्लीत विकावा लागला. तोच टोमॅटो केवळ पंधरा दिवसांत कवडीमोल झाला आहे. पंधरा ऑगस्टपासून टोमॅटोच्या दरात घसरण सुरू झाली होती. दर वेगाने कोसळले आहेत. शेतकऱ्यांना आता पाच ते सात रुपये प्रति किलो दर मिळत आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना १५ ते २० रुपये प्रति किलो दराने टोमॅचो मिळत आहेत.
जी २० चा असाही फटका
राजधानी दिल्ली जी-२० परिषदेच्या निमित्ताने मागील चार दिवस बंद होती. दिल्लीची कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद होती. त्यामुळे नारायणगाव आणि नाशिकमधून दिल्लीला जाणारी जावक बंद झाली. नारायणगावमधून रोज सुमारे पाच ते सहा आणि नाशिक, पिंपळगावमधून रोज सुमारे १०० ट्रक टोमॅटो दिल्लीला जातो. मागील चार दिवसांपासून ही जावक बंद झाल्यामुळेही टोमॅटोचे दर पडले आहेत. दिल्लीचा बाजार सुरळीत झाल्यानंतर दरात वाढ होण्याचा अंदाज जुन्नर बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यभरात टोमॅटोचे उत्पादन वाढले आहे. स्थानिक पातळीवरील उत्पादन स्थानिक गरज भागवत आहे. दिल्लीचा बाजार चार दिवसांपासून बंद आहे. त्याचा परिणामही दरावर दिसून येत आहे. शेतकऱ्यांना प्रति किलो सरासरी पाच ते सात रुपये दर मिळत आहे. – रुपेश कवडे, सचिव, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती