पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेशांसाठी उद्या (५ जुलै) शेवटचा दिवस आहे. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ३४ हजार ७३२ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला असून, अद्यापही ७९ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी यंदा ३२६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १ लाख १४ हजार ३५० जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. प्रक्रियेच्या दुसर्या फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. दुसऱ्या फेरीत २० हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५ जुलै रोजी सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली. दुसऱ्या फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे.
पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील त्यांच्या लॉगइनद्वारे प्रोसिड फॉर अॅडमिशन हा पर्याय निवडून प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत केंद्रिभूत प्रवेशांद्वारे २९ हजार ६७० आणि कोटा प्रवेशाअंतर्गत ५ हजार ६२ अशा एकूण ३४ हजार ७३२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.