कोटीच्या कोटी उड्डाणे करून उभारण्यात येत असलेला ४५ किलोमीटरचा बहुचर्चित ‘बीआरटी’ मार्ग सुरू करण्याची पूर्ण तयारी पिंपरी महापालिकेने केली आहे. तथापि, बीआरटी सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच उद्भवणारे धोके याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून दापोडी ते निगडी, काळेवाडी ते देहू-आळंदी, सांगवी ते किवळे आणि नाशिकफाटा ते वाकड हे चार बीआरटी मार्ग प्रस्तावित आहेत, त्याची सर्व मिळून लांबी ४५ किलोमीटर इतकी असून यासाठी ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात, सत्ताधारी नेते व बडय़ा अधिकाऱ्यांचे ‘अर्थकारण’ पाहता यापेक्षा कितीतरी अधिक खर्च होणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत. एक जूनपासून बीआरटीचे दोन मार्ग सुरू करू, असे सूतोवाच आयुक्त राजीव जाधव यांनी नुकतेच केले. प्रत्यक्षात, इतक्यात बीआरटी सुरू करण्यास अधिकारी असमर्थता व्यक्त करत आहेत. बीआरटी मार्ग सुरू झाल्यास अनेक समस्या उद्भवतील, त्यातून बिकट परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते विनोद नढे, नगरसेविका सीमा सावळे यांनी वेळोवेळी यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. बीआरटी मार्गात उजव्या हाताला केलेले बसस्टॉप अतिशय चुकीचे आहेत, असे सांगत अॅड. हिम्मतराव जाधव यांनी न्यायालयात दाद मागितली असून पुणे व पिंपरी महापालिका, पीएमपीएल, पुणे पोलीस आयुक्त आदींना प्रतिवादी केले आहे. या मार्गाचे ‘सेफ्टी ऑडिट’ करावे, अशी मागणी करणाऱ्या सावळे तसेच सारंग कामतेकर यांच्या तक्रारीनुसार, पिंपरीत ग्रेड सेपरेटर व सेवा रस्त्याच्या मध्ये बीआरटी आहे, प्रत्यक्षात अशी रचना कुठेही नाही. आत येण्याचा व बाहेर पडण्याचा मार्ग अपघाताचे केंद्र होणार आहे. त्याविषयी ठोस उपाययोजना नाही. कासारवाडी, काळभोरनगर, आकुर्डी, फुगेवाडी येथील अंडरपासमधून जाणाऱ्या वाहनांना बीआरटी मार्ग ओलांडावे लागणार आहे व तो धोकादायक आहे. बीआरटी मार्ग बंदिस्त केल्याने एखादे वाहन बंद पडल्यास संपूर्ण रस्ता व त्यावरील वाहतूक ठप्प होणार आहे. बीआरटीच्या मूळ आराखडय़ाप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
बीआरटीसंदर्भात होत असलेल्या तक्रारी व संभाव्य धोक्यांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. आपण पिंपरीत येण्यापूर्वीच हा विषय मार्गी लागला असल्याने आयुक्त जाधव त्यात फार बदल करण्यास उत्सुकत नाहीत. बीआरटी मार्गामुळे काय परिस्थिती होणार आहे, याचे प्रातिनिधीक चित्र दापोडी ते निगडी मार्गावर दररोज दिसू लागले आहे. या संदर्भात योग्य खबरदारी न घेतल्यास अनेक अडचणी नव्याने निर्माण होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 
तक्रारींची दखल घेऊ- राजन पाटील
बीआरटी मार्गावर त्रुटी नाहीत. या संदर्भात प्राप्त तक्रारींची योग्य ती दखल घेऊ, अशी प्रतिक्रिया सहशहर अभियंता राजन पाटील यांनी व्यक्त केली. बीआरटी मार्ग सुरू करण्यास आणखी अडीच ते तीन महिने कालावधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा