पिंपरी पालिकेत वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या ‘संस्थानिक’ अधिकाऱ्यांना आयुक्तांनी उशिरा का होईना बदलीचा रस्ता दाखवला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या बांधकाम विभागाचे उपशहर अभियंता वसंत काची यांनाही आपला बालेकिल्ला सोडावा लागला आहे.
पालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी काही दिवसात बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे पालिकेचे सर्व विभाग ढवळून निघाले होते. त्यावेळी काही विभागातील बडे अधिकारी तसेच राहिले होते. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर, उशिरा का होईना, त्यांनाही बदलीला सामोरे जावे लागले आहे. वसंत काची यांना जलनिस्सारण विभागात पाठवण्यात आले असून त्यांच्याकडे अ आणि ब प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. काची यांच्या जागी अयुब खान पठाण यांची वर्णी लावण्यात आली आहे. भोसरीत असलेले रवींद्र दुधेकर यांना मुख्यालय व ‘ब’ प्रभाग स्थापत्य विभाग देण्यात आला आहे. वसंत साळवी यांना स्थापत्य ‘क’ विभागात पाठवण्यात आले आहे. चिंचवडमध्ये असलेल्या कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना जलनिस्सारण क व ड विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्वाना तातडीने नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.