मुंबई – टोरेस गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुल संचालनालयाने (ईडी) गुरूवारी १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात मुंबईतील १० व जयपूर येथील तीन ठिकाणांचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात  नुकतीच ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानचा नागरिक आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडीकडून गुरूवारी सकाळपासूनच मुंबईतील १० ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात येत आहे. त्याशिवाय राजस्थानमधील ३ ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळ्या भागांमध्ये ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या कंपनीने हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. वर्षभर व्यवसायही केला. या गैरव्यवहारात सव्वा लाख गुंतवणूकदारांनी एक हजार कोटी रुपये गमावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटिस जारी केल्या आहेत.

तक्रारदार भाजी विक्रेते वैश्य (३१) यांनी याप्रकरणी सव्वा लाख लोकांनी टोरेस कंपनीत पैसे गुंतवल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत तीन हजार ७११ गुंतवणूकदार पोलिसांसमोर आले असून त्यामुळे फसवणुकीची रक्कम ५७ कोटींवर पोहोचली आहे. ईडी याप्रकरणी फेब्रुवारी २०१३ पासून प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करणार आहे. गुंतवणूक करण्यात आलेली रक्कम रोख स्वरूपात आहे. त्यानंतर दादर येथील शाखेत रक्कम जमा करून ती कथित स्वरूपात हवाला नेटवर्कद्वारे कूटचलनाद्वारे परदेशात पाठवण्यात आल्याचा संशय आहे.

या प्रकरणात २०० कोटी रुपये परदेशात पाठवण्यात आल्याचा संशय आहे. त्याबाबत ईडी तपास करत आहे. टोरेसकडून अनेक गुंतवणूक योजना राबवण्यात आल्या होत्या. त्यात दर आठवड्याला सहा टक्के व्याज देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. मुंबई, नवी मुंबई, आणि मीरा रोड येथील हजारो गुंतवणूकदार ६ जानेवारी रोजी टोरेसच्या दादर, मीरा रोड, आणि एपीएमसी नवी मुंबई येथील कार्यालयाबाहेर जमले आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांचे व्याज थकवले गेल्यामुळे आंदोलन नागरिकांनी आंदोलन केले. त्याच दिवशी शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही रक्कम हजारो कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय मीरा भाईंदरच्या नवघर पोलीस, ठाण्याच्या राबोडी पोलीस, आणि नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी या सर्व प्रकरणाचा मिळून तपास करणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Torres fraud case ed raids 13 places in mumbai and jaipur mumbai print news zws