शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणारा हजारो कोटी खर्चाचा पर्यटन विकास आराखडा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व त्यांचे प्रभाग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून शहर विकासात अशाप्रकारे पक्षपातीपणा व राजकारण करू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
हिंजवडी येथे शिवसेना नगरसेवकांची बैठक झाली. तेव्हा पालिकेच्या आगामी अंदाजपत्रकीय सभेसंदर्भात गटनेते श्रीरंग बारणे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना मार्गदर्शन केले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या दुटप्पीपणावर ताशेरे ओढले. शिवसेना नगरसेवकांच्या एका महिन्याची रक्कम मिळून एक लाख पाच हजारांची रक्कम दुष्काळ निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले व पालिकेनेही दुष्काळी भागासाठी ५ कोटींची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. पालिकेच्या पर्यटन विकास आराखडय़ात भोसरी तळे, बर्ड व्हॅली, गणेश तलाव आदींचे सुशोभीकरण तसेच मॉडेल म्हणून पक्षनेत्यांच्या प्रभागाची निवड करण्यात आली आहे. शहरातील इतर महत्त्वपूर्ण भागांना डावलण्यात आले आहे, या पक्षपातीपणाकडे त्यांनी लक्ष वेधले. पालिका आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात नवीन काहीच नसून जुन्या कढीला ऊत देण्यात आला आहे. शहरातील नागरी विकासाच्या कामांकडे दुर्लक्ष होत असून पाणीपुरवठा विस्कळीत आहे, असे ते म्हणाले.
 ‘बहल, कदम यांचे पद रद्द करा’
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल व पालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी या वेळी केली. सायन्स पार्कच्या कार्यकारिणीवर करण्यात आलेली बहल, कदम यांची नियुक्ती बेकायदेशीर आहे. पालिकेचा हा प्रकल्प आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा असल्याने अशा ठिकाणी नगरसेवकांची नियुक्ती करता येते का, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Story img Loader