टूर कंपन्यांबरोबर प्रवास करताना पाळावे लागणारे काटेकोर वेळापत्रक, पाहायला मिळणारी निवडकच लोकप्रिय ठिकाणे आणि प्रचंड खर्च या गोष्टींना फाटा देऊन मूळच्या पुण्याच्या असलेल्या किरण वैद्य आणि चांदनी रॉय या जोडप्याने स्वत:ची सहल स्वत:च आखून जगाला प्रदक्षिणा घालायचे ठरवले आहे. माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या आणि सध्या टोरांटोमध्ये स्थायिक झालेल्या किरण आणि चांदनीने या जगप्रवासासाठी चक्क आपल्या नोक ऱ्या सोडल्या असून गेल्या सहा महिन्यांत त्यांनी २४ देश पालथे घातले आहेत. सध्या हे दोघे भारतात आले असून जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत त्यांचा प्रवास चालणार आहे.
टोरांटोहून सुरूवात करुन किरण व चांदनीने युरोपातील २० देश पाहिले. उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को व पूर्व आफ्रिकेत टांझानिया, झांजिबार आणि केनिया पाहून ते भारतात आले. आता थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशिया बघून पुढे न्यूझीलंड, मेक्सिको, कोलंबिया, इक्व्ॉडोर आणि कोस्टा रिका करुन ते टोरांटोला परतणार आहेत. ‘‘या सहलीची योजना आमच्या डोक्यात गेली तीन वर्षे होती, पण गेल्या एक वर्षांत खूप गांभीर्याने प्रवासाची आखणी केली. वर्षभर चित्रपट पाहणे, रेस्टॉरंटमध्ये जाणे, खरेदी करणे असे खर्च पूर्णत: टाळले. घर घेणेही लांबणीवर टाकले व सहलीसाठी पैसे जमवले,’’ असे किरण यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘जगप्रवास आता नाही, तर कधीच नाही, या विचाराने आम्ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. प्रवास सुरू करण्यापूर्वी थोडी भीती वाटत होती. आताही टोरांटोला परतल्यावर काय होईल ते माहिती नाही. परंतु त्याचा आम्ही सध्या विचार करत नाही.’’
चांदनी म्हणाल्या,‘‘हल्ली बऱ्याच गोष्टी ‘ऑनलाईन’ होऊ शकत असल्याने प्रवासात फारशा अडचणी आल्या नाहीत. परंतु भाषा ही मोठी अडचण होती. अॅमस्टरडॅम किंवा हॉलंडच्या आतल्या भागात लोक केवळ डच बोलतात. अशा ठिकाणी संवाद साधण्यात वेळ जात असे. परंतु जिथे जाऊन तेथील स्थानिकांचे जीवन जवळून पाहायचे असे आम्ही ठरवले होते.’’
‘‘केनियातील जंगल सफारी खूप जण करतात पण त्याच देशातील ‘हेल्स गेट नॅशनल पार्क’मध्ये झेब्रा, जिराफ, हरणांसारखे गवत खाणारे प्राणी आजूबाजूला फिरत असताना सायकलवरुन फिरण्याची मुभा असते. अशी ठिकाणे पाहण्याची संधी सर्वाना मिळत नाही,’’ असे किरण यांनी सांगितले. ते म्हणाले,‘ ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही आमची आवडती मालिका असल्यामुळे त्याचे छायाचित्रण जिथे झाले ती ठिकाणे पाहण्याची आम्हाला उत्सुकता होती. या छायाचित्रणातील ४० ठिकाणे आम्हाला बघायला मिळाली असून त्यातील सर्वाधिक माल्टा व क्रोएशियात आहेत.’
व्हिसाच्या नियमांच्या अडचणी
विविध देशांमधील व्हिसाचे नियम वेगवेगळे व क्लिष्ट असल्याने भारतीय पारपत्रावर सलग जगप्रवास करणे आव्हानात्मक असल्याचेही किरण यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘काही देशांत व्हिसा मिळवताना परतण्याचे तिकिट देखील दाखवावे लागते, तसेच व्हिसा देताना त्यासाठी ठरावीक महिन्यांची मुदत ठरवून दिली जाते. तर युनायटेड किंग्डमसारख्या ठिकाणी व्हिसा मिळवायलाच १ ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.’’
नोकऱ्या सोडून जगप्रवास!
पुण्याच्या असलेल्या किरण वैद्य आणि चांदनी रॉय या जोडप्याने स्वत:ची सहल स्वत:च आखून जगाला प्रदक्षिणा घालायचे ठरवले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 12-02-2016 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism lovers couple travel world leaving vacancies