श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय या बैठकीत झाला.
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. आता ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळेसाठी ४.५० कोटी, क्रीडा विकासासाठी १६ कोटी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३.१० कोटी निधी देण्यात आला आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : पाळीव श्वानाच्या पिलाला चप्पलेने मारहाण करणे पडले महागात
राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली गावे लक्षात घेता तेथील सुविधांसाठी डीपीसीमार्फत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्यात येणार आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलाला वाहनांसाठी निधी देण्याचा आणि पोलिसांनी अद्ययावत साहित्याची मागणी आल्यास निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात राज्य शासनाची ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत खर्चाला मान्यता
या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२२-२३ मधील मार्च २०२३ अखरे झालेल्या ८७५ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी एकूण १०० टक्के खर्च झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली.