पुणे : सध्या शालेय परीक्षांचे दिवस सुरू असल्याने पेशवे उद्यानात मोजक्याच संख्येने उपस्थित बाळगोपाळांच्या अमाप उत्साहात ‘फुलराणी’चा केक कापून लाडक्या फुलराणीचा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. केक कापल्यानंतर बालकांसह पालकांनीही फुलराणीमध्ये फिरण्याची मौज अनुभवली.
पेशवे उद्यानातील फुलराणीने मंगळवारी सत्तरीमध्ये पदार्पण केले. या निमित्ताने झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास बाळगोपाळांसह पालकही उपस्थित होते. उद्यान अधीक्षक संतोष कांबळे, सहायक उद्यान अधीक्षक श्रुती नाझीरकर, पर्यवेक्षक सर्जेराव काळे, उद्यान निरीक्षक विलास पाठक यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. अगरबत्तीने वातावरणात दरवळणारा सुगंध, फुग्यांंसह झिरमिळ्यांनी फुलराणीची केलेली सजावट अशा वातावरणात फुलराणीचा वाढदिवस लहानग्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. केकसह खाऊ देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. एका आजीने आपल्या दाेन मुली आणि नात यांच्यासमवेत फुलराणीमध्ये सफर करण्याचा आनंद तीन पिढ्यांनी एकत्रितपणे लुटला.