स्थानिक संस्था करासह (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) किरकोळ विक्री क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी गुरुवारी (७ मार्च) बंद पुकारला आहे. बंदला राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे घाऊक आणि किरकोळ माल विक्रीची लाखो दुकाने गुरुवारी बंद राहतील.
पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी बुधवारी ही माहिती दिली. पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांमधील जकात १ एप्रिलपासून रद्द होत असून त्याऐवजी महापालिकांमध्ये एलबीटी लागू होणार आहे. या नव्या कराला व्यापारी संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. एलबीटी तसेच किरकोळ विक्री क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट- एफडीए) विरोध करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी वर्गाला ज्या अडचणी येत आहेत, त्याकडे राज्य व केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे सेटिया यांनी सांगितले.
घाऊक व किरकोळ माल विक्रीची सर्व दुकाने मिळून पुण्यात सुमारे सहा लाख दुकाने असून गुरुवारी हा सर्व व्यापार बंद राहील. पुणे शहरातील तसेच पिंपरी-चिंचवडमधील किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांच्या सर्व संघटनांनी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नगर, सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, जळगावसह अनेक शहरांमधील संघटनांनीही बंदला पाठिंबा दिल्याची माहिती सेटिया यांनी दिली.
जकात रद्द होणार अशी घोषणा करण्यात आली असली, तरी जकातीऐवजी एलबीटी हा नवा कर आणला जात असून त्यातील अनेक तरतुदींमुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे एलबीटी हा नवा कर सुटसुटीत, सुलक्ष व समान असावा, अशी व्यापारी संघटनांची एकमुखी मागणी आहे.