छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ १३ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला पुणे शहर व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहीर केला आहे. मंगळवारी (१३ डिसेंबर) शहरातील व्यापारी दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
हेही वाचा- पुणे : विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली स्थगितीच्या निर्णयाला विरोध
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच विविध संघटनांकडून पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले होते. त्यानंतर व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (८ डिसेंबर) पार पडली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, नितीन काकडे, अरविंद कोठारी, सचिव महेंद्र पितळीया, सहसचिव मिलिंद शालगर, राहुल हजारे आदी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा- पुणे : गुजरातमधील विजयानंतर पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
या बैठकीत शहरातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. १३ डिसेंबर रोजी शहरातील दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी कळविले आहे.