पिंपरी : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा रविवारी (१६ मार्च) साजरा होत आहे. त्यानिमित्त राज्यभरातून भाविक देहू येथे येतात. वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देहू आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूगाव कमान येथून देहुगाव कडे येणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता खासगी वाहनांसाठी रस्ता बंद राहील. महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर अथवा कैनबे चौक, आयटी पार्क चौकाकडे जाता येणार नाही. या मार्गावरील वाहनांना महिंद्रा सर्कल, निघोजे, मोईफाटा, डायमंड चौक मार्गे जाता येईल.
तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथून देहुगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावरुन आत येणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहने एच पी चौक मार्गे जातील. देहु कमान, १४ टाळकरी कमान, इंद्रायणी पुल, हॉटेल कॉर्नर दरम्यानचा रस्ता, १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक दरम्यानचा रस्ता आणि खंडेलवाल चौक ते देहुकमान (मुख्य) हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडे मळा (जकात नाका) हा वन वे असेल.
पार्किंग व्यवस्था
आळंदी-तळवडे बाजूने येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजन काटा, काळोखे पाटील चौक येथील श्री चव्हाण यांचे पार्किंग व गायरान पार्किंग देहू येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. गायरान पार्किंग देहू येथे पीएमपीएल बस थांबा केला आहे. देहू कमान देहूरोड ते देहूगावकडे येणाऱ्या वाहनांसाठी राधाकृष्ण लॉन्सच्या शेजारील सीओडीच्या जागेत पाकिंगची सोय करण्यात आलेली आहे.
चाकण-तळेगांव रोडवरील देहुफाटा येथून देहुगांवकडे येणाऱ्या वाहनांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स व भगिरथी लॉन्स येथे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. तसेच साईराज चौक ते देहूफाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स यांच्या जागेत वाहने पार्क करता येतील.