लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : रमजान ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार आहे. नमाज पठणासाठी मुस्लीम बांधवाची गर्दी होणार असल्याने या भागाताील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरी करण्यात येते. चंद्रदर्शन रविवारी (३० मार्च) सायंकाळी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोमवारी (३१ मार्च) रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदान येथे सोमवारी सकाळी सामुदायिक नमाज पठण होणार आहे. सोमवारी सकाळी साडेसहा ते साडेअकरापर्यंत या भागातीला वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चौक ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर रस्त्याने स्वारगेटकडे जाणारी जड वाहने भैरोबानाला चौकातून डावीकडे वळून प्रिन्स ऑफ वेल्स रस्तामार्गे लुल्लानगर येथून इच्छितस्थळी जातील. पुणे स्टेशन, तसेच शहरात जाणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. हलकी वाहने एम्प्रेस गार्डनमार्गे इच्छितस्थळी जातील. स्वारगेटकडून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहने सेव्हन लव्हज चौकातून (ढोले पाटील) चौकातून उजवीकडे वळून सॅलिसबरी पार्कमार्गे खटाव बंगला येथून उजवीकडे वळून लुल्लानगर किंवा सोलापूर रस्त्याकडे जातील. सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी लष्कर भागातील खाणे मारुती चौक, पूलगेट स्थानकमार्गे सोलापूर बाजार चौक, नेपीयर रस्ता, खटाव बंगला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील ईदगाह मैदान परिसरात नमाज पठण होणार आहे. त्यानिमित्ताने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन पर्यांयी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.