लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त मंगळवारपासून वाहतुकीत बदल करण्यात आल्याने पहिल्याच दिवशी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. दररोजच्या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाद्वारे जावे लागल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र होते. कात्रज बोगद्याकडून येणारी आणि साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर जड वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याने सकाळच्या वेळेत कामावर जाणारे वाहनचालक, रिक्षाचालक, तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने कोंडीत बराच काळ अडकून पडल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे (सेटमेंटल लॉन्चिंग) काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. जड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तशा आशयाचे फलक नसल्याने चालकांनी चौकातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहनधारकांचा गोंधळ झाला होता. सातारा, सांगली, कोल्हापूर येथून कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या जड वाहनांच्या रांगा लागल्याने ही वाहतूक वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. पोलिसांनी टप्प्याटप्प्याने वळविलेल्या मार्गावरून जड वाहने मार्गस्थ केली असली, तरी इतर वाहतुकीवर परिणाम झाला.

आणखी वाचा-कारावास भोगलेल्या नागरिकांना निवृत्तीवेतन

मंतरवाडी, उंड्री, पिसोळी, मार्केट यार्ड, गंगाधाम, हडपसर मंतरवाडीमार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली.दरम्यान, वाहतुकीत बदल केल्याने पहिल्या दिवशी अवजड वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, याबाबत वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाने पुन्हा एकदा सूचना देऊन पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे निर्देश दिले आहेत.

एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले

कात्रज चौकात झालेल्या कोंडीत सातारा, सांगली आणि कोल्हापूरहून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस अडकून पडल्याने एसटीचे वेळापत्रक कोलमडले. या बस उशिराने स्वारगेट स्थानकावर पोहोचल्याने प्रवाशांना ताटकळावे लागले.

आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला पकडले

सांगली, सातारा, कोल्हापूरवरून कात्रज चौकात येणाऱ्या एसटी बसला बंदी असणार आहे. या बस नव्या बोगद्यातून नवले पूल, पासलकर चौक पूलमार्गे सिंहगड रस्त्याने स्वारगेटसाठी शहरात प्रवेश करतील. -प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग एसटी महामंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes due to flyover work at katraj chowk confusion among people due to having to take alternative route pune print news vvp 08 mrj