पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) दुमजली उड्डाणपुलाच्या कामानिमित्त बाणेर भागाकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
विद्यापीठ चौकात दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बुधवारपासून (१५ जानेवारी) प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. राजभवन समाेरून (पंक्चर) वाहनांनी वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने इच्छितस्थळी जातील. औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात येणार आहे. तेथून बाहेर पडणारी वाहने विद्यापीठाच्या आवारातून इच्छितस्थळी जातील.