लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्या (शनिवारी) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि अति महत्वाच्या व्यक्ती तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बालेवाडी परिसरातील वाहतूक वळविण्यात आली आहे. बालेवाडी क्रीडा संकुल जवळील राधा चौक ते मुळा नदी पुलापर्यंत सेवा रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला येणारी वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने या मार्गाने जाऊ शकतील.
बालेवाडी येथील बंटार भवन व आजूबाजूच्या परिसरात वाहनांची पार्किंग करण्यात येत असल्याने पार्किंग ठिकाणच्या मार्गावर जड, अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला येणारी वाहने आणि प्रवासी बसेस या मार्गाने जाऊ शकतील. हा बदल शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे.
© The Indian Express (P) Ltd