लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महापालिकेकडून घोरपडी गाव ते हडपसर परिसराला जोडणाऱ्या बी. टी. कवडे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखालील रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मंगळवारपर्यंत (२८ नोव्हेंबर) वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
घोरपडी गाव ते हडपसर परिसराला जोडणारा बी. टी. कवडे रस्ता महत्वाचा रस्ता आहे. या भागातील नागरिक मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात. बी. टी. कवडे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली असलेल्या रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साठते. तेथे पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे : विमाननगरमधील नागरिक लढ्याच्या तयारीत, निवडणूक बहिष्काराचा इशारा
बी. टी. कवडे रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली कुसुमकुंज निवास ते रेंजेट हाईट बिल्डींग दरम्यान उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडील हडपसरकडे जाणारी वाहतूक २८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. वाहनचालकांनी उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूकडील मार्गिकेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.