लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी (१४ एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होती. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळी सहापासून रात्री गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

आणखी वाचा-शरद पवार यांचा बेरजेच्या राजकारणावर भर, तब्बल पाच दशकाने घेतली काकडे कुटुंबियांची भेट

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे : मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकापासून जिल्हाधकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक शाहीर अमर शेख चैाकातून वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चौकातून इच्छितस्थळी जावे. मुख्य टपाल कार्यालय परिसरातून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नेहरु मेमोरिअल हॉल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी अलंकार चित्रपटगृह चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. रास्ता पेठेतील बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नरपरतिगी चौक, पंधरा ऑगस्ट चौक, कमला नेहरु चौक, पवळे चौक, कुंभारवेस चैाकातून इच्छितस्थळी जावे.

आणखी वाचा-पिंपरी : ‘कॉर्पोरेशन’ ऐवजी ‘कन्स्ट्रक्शन’झाले आणि…!

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येणाऱ्या अनुयायांसाठी वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मालधक्का चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, बोल्हाई चौक ते जीपीओ, बोल्हाई चौक ते नरपतगिरी चौक, फोटो झिंको प्रेस उपरस्ता, बोल्हाई चौक ते बॅनर्जी चौक या भागात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

ससून रुग्णालयात जाणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश

ससून रुग्णालयात जाणारे रुग्ण, तसेच रुग्णवाहिकांसाठी शवागाराजवळील (डेड हाऊस) प्रवेशद्वाराने प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार नाही. एसएसपीएमएस मैदान (दुचाकी आणि चारचाकी वाहने), पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळ (दुचाकी आणि चारचाकी वाहने), ससून क्वार्टर्स (दुचाकी ) येथे वाहने लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दांडेकर पूल परिसरात वाहतूक बदल

दांडेकर पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. स्वारगेटकडून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, सणस मैदान रस्ता, ना. सी. फडके रस्ता, मांगीरबाबा चौक, सेनादत्त चैाकी, दत्तवाडी परिसरातून सिंहगड रस्त्याकडे जावे. सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनांनी गणेशमळा परिसरातील हॉटेल आशा, दत्तवाडी, सेनादत्त चौकीमार्गे, मांगीरबाबा चौकातून वळून ना. सी. फडके सभागृहमार्गे स्वारगेटकडे जावे. शास्त्री रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी मांगीरबाबा चौकातून डावीकडे वळून ना. सी. फडके चैाकमार्गे स्वारगेटकडे जावे.

आणखी वाचा-पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात

लष्कर, विश्रांतवाडी भागात वाहतूक बदल

लष्कर भागातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात होणारी गर्दी विचारात घेऊन या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी तारापोर रस्ता, इस्ट स्ट्रीट परिसरात वाहने लावावीत. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडीतून टिंगरेनगर, विमानतळाकडे जाणारी वाहतूक मनोरुग्णालय, येरवडा कारागृहमार्गे वळविण्यात आली आहे.

Story img Loader