लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
‘मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. लष्कर भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-परवडणाऱ्या घरांमध्ये अहमदाबाद पहिले, पुणे दुसरे तर मुंबई सगळ्यात शेवटी!
फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे : कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.
हे रस्ते वाहनांसाठी बंद
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात मंगळवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाचनंतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्त्यावरील) गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पहाटे पाचपर्यंत वाहनांना बंदी राहणार आहे.
आणखी वाचा-वाहनचालकांच्या खिशाला झळ! सीएनजी दरवाढीचा पुन्हा दणका
मद्यपींवर करडी नजर
‘मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालविणारे दुचाकीस्वार, मोटारचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनलायझर यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. तपासणीसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिक नळी नष्ट करण्यात येणार आहे. त्याचा पुनर्वापर करण्यात येणार नाही. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे,’ असे आवाहन अमोल झेंडे यांनी केले आहे.
© The Indian Express (P) Ltd