जुन्नर येथील शिवनेरी किल्ला येथे १९ फेब्रुवारी रोजी आयोजित श्री शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले. १८ फेब्रुवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आणि त्यांच्या वाहनांची होणारी गर्दी पाहता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
नारायणगाव येथून जुन्नर येथे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रस्त्याने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड वाहनतळ या ठिकाणी जातील. ताथेड वाहनतळ येथे लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील. गणेशखिंड, बनकफाटा ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल आणि आसपासचे परिसरात असलेले वाहनतळ या ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील. जुन्नर तालुक्यातील आपटाळे, सोमतवाडीकडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड वाहनतळ येथे जातील आणि पुन्हा वडज मार्गे जातील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.