नाताळ सणानिमित्त लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत शनिवारी (२४ डिसेंबर) सायंकाळनंतर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात नाताळ सणानिमित्त मोठी गर्दी होते. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
हेही वाचा- पुणे : टीईटीचा निकाल जाहीर; केवळ ३.७० टक्के उमेदवार पात्र
महात्मा गांधी रस्त्यावरुन येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करण्यात येईल. या भागातील वाहतूक कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी दुकानाजवळून वळविण्यात येणार आहे. इस्काॅन मंदिर चौकाकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टाॅवर्सकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक एसबीआय हाऊस चौक, तीन तोफा चौका येथून लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार आहे. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक ताबुत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे.