लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सेना दिन संचलनानिमित्त शनिवारपासून (११ जानेवारी) पाच दिवस येरवडा भागातील चंद्रमा चौक, होळकर पूल दरम्यान सकाळी सात ते अकरा दरम्यान वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक बदल १५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
येरवड्यातील शादलबाबा चौक ते चंद्रमा चौकमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी शादलबाबा चौक, डाॅ. आंबेडकर चौक, आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलीस चौकी, जुना होळकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. विश्रांतवाडीकडून होळकर पूलमार्गे खडकीकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
आणखी वाचा-स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन
विश्रांतवाडी, साप्रस पोलीस चौकीमार्गे, जुना होळकर पूलमार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. बोपोडी चौक, खडकी बाजार, चर्च चौक दरम्यान होळकर पूल, येरवड्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पाटील इस्टेट, वाकडेवाडीमार्गे इच्छितस्थळी जावे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन अंडी उबवणी केंद्र (पोल्ट्री चौक) परिसरातील भुयारी मार्गातून मुळा रस्तामार्गे खडकी बाजारकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.