पुणे : मुंढवा चौकात होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या भागात प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल केले आहेत. या चाैकातील सिग्नल बंद केल्याने वाहतूक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

मुंढवा चौक गजबजलेला चौक आहे. खराडी आयटी पार्क, तसेच मगरपट्टा आयटी पार्ककडे जाणारी वाहने, तसेच नगर, सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. या चौकातील सिग्नलमुळे वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त अमोल झेंडे यांनी या चौकाची पाहणी केली होती. या चौकातील वाहतूक गतिमान करण्यासाठी मुंढवा चौकातील सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या भागातील वाहतूक गतिमान करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

मुंढवा चौकातून खराडी, हडपसरकडे जाणारी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी घोरपडीतून केशवनगरहून मांजरी, हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी मुंढवा चैाकातून डावीकडे जावे. तेथून मुंढवा येथून उजवीकडे वळून (यू टर्न) घेऊन इच्छितस्थळी जावे. बस, टेम्पोसह अन्य चारचाकी वाहनांनी यू टर्न न घेता साईनाथनगरकडे जावे. तेथून यू टर्न घेऊन इच्छितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

केशवनगरकडून खराडी, कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या वाहनांनी मुंढवा चौकातून डाव्या बाजूने जावे. मुंढवा रेल्वे उड्डाणपूल येथून उजवीकडे वळून (यू टर्न) इच्छितस्थळी जावे. बस, टेम्पोसह अन्य चारचाकी वाहनांनी भुयारी मार्ग (अंडरपास) न वळता रेल्वे उड्डाणपुलाकडून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.